गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार: आमदार भरतशेठ गोगावले
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरतशेठ गोगावले यांनी जी ताकद आपल्या पाठीशी उभी केली त्याची व्याजासहित परतफेड करा: खासदार सुनील तटकरे
गोरेगाव माणगाव
194 महाड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार भरत शेठ गोगावले यांची प्रचार सभा 6 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथे पार पडली. या सभेस लोणेरे पंचायत समिती गण व मांजरवणे पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये मुस्लिम समाजातील बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.
आयोजित सभेत संबोधित करताना गोरेगाव चे सरपंच जुबेर भाई अब्बासी यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असूनही संकटात असताना भरतशेठ गोगावले आपल्याला केलेल्या मदतीची आठवण करून दिली. भरत शेठ गोगावले कधीही पक्ष बघत नाहीत तर नि:पक्षपाती काम करण्याकडे त्यांचा कल असतो असे गौरवोद्गार काढले. गोरेगाव मध्ये जो विकास झाला तो विकास केवळ आपल्या आणि खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झाला आहे. खासदार तटकरे यांच्या आदेशाने आम्ही शब्द देतो की या परिसरातील संपूर्ण राष्ट्रवादी भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं वचन उपस्थितांसमोर दिले.
हिंदू,मुस्लिम, बौद्ध, कुणबी, तेली,माळी, कुंभार, चांभार कुठल्याही समाजाचा माणूस भरतशेठ गोगावले यांच्याकडे जेव्हा जातो त्यावेळेस भरतशेठ कधीही जात विचारत नाहीत. त्यांना सढळ हस्ते मदत करत असतात, असे धर्मनिरपेक्ष लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांना हवेत म्हणून भरत शेठ गोगावले यांना धनुष्यबाण चिन्हा समोर बटन दाबून विजय करा असे आवाहन जाहीर सभेतून संपर्कप्रमुख अरुण चाळके यांनी केले.
आमदार भरत शेठ गोगावले यांनी हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, रायगडचे भूमिपुत्र बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी केलेल्या महत्त्वाच्या विकास कामांची आठवण करून दिली.
तर महाड विधानसभेमध्ये आपण देखील सर्व जाती-धर्मांच्या बेड्या तोडून विकास कामे करीत असल्याची जाणीव उपस्थित जनसमुदायाला करून दिली. विरोधकांकडे कोणतेही भांडवल नाही, गावातील हेव्या देव्यामुळे विरोधक गावात मत मागायला येतात, मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका अशी सूचना देखील दिली. महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात पहिली योजना महिलांच्या कल्याणासाठी एसटी बस मध्ये अर्ध तिकिटाचे आणली. यासोबतच लेक लाडली लखपती योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना, फुकट राशन, आनंदाचा शिधा आदी लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर काल प्रकाशित झालेल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रति महा 1500 रुपये यामध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा असे आवाहन आमदार भरत शेठ गोगावले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीलाच 'सडलेल्या मेंदूतून विकृत मनोवृत्तीने कोणी माझ्या बद्दल काही बोलला असेल तरी 23 तारखेला तुमच्या विजयाला कोणताही गालबोट लागणार नाही याची हमी आमदार गोगावले यांना उपस्थित जनसमुदायासमोर दिली. आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झाल्यापासून आमचा विचारांना मूठ माती दिली, असा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष विचार मांडला आहे, त्या विचारांशी आमची बांधिलकी अजूनही आहे म्हणून मुस्लिम समाजाच्या भगिनी आज मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे उदगार सुनिल तटकरे यांनी काढले. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि याचा लाभ 2 कोटी 25 लाख महिलांना मिळाला. परंतु या योजनेला विरोध करण्याचा सामाजिक पाप महाविकास विकास आघाडीच्या सरकारने केल. ती योजना बंद पडावी म्हणून काही लोकांना हाताशी धरून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं काम यांनी केल याची आठवण सभेस संबोधित करताना करून दिली. संपूर्ण देशभरामध्ये विकसित राज्य अशी ओळख महाराष्ट्राची आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये अधिक वेगाने विकासाची काम भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरतशेठ गोगावले यांनी जी ताकद आपल्या पाठीशी उभी केली त्याची व्याजासहित परतफेड करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जाहीर सभेतून तटकरे यांनी केले. जे मत तुम्ही सुनील तटकरेंना केले तेच मत भरतशेठ गोगावले यांना करा आणि पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करा अशा सूचना महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या.
सभेस रायगड लोकसभेचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, युवा सेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे, दक्षिण रायगड जिल्हा महिला संघटिका नीलिमा घोसाळकर, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष नाना महाले, शितल गोगावले शितल गोगावले, मुख्तर वेळासकर,सरपंच झुबेर अब्बासी, असद भाई फकीर, नथुराम बामनोलकर, मंगेश कदम, पंढरी शेडगे यांसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments