Type Here to Get Search Results !

भुकेल्यांची भूक भागविणारी 'शिवभोजन थाळी' ठरतेय अनेकांसाठी संजीवनी


रुची हॉटेल येथील शिवभोजन थाळी केंद्रात दररोज ५० जण घेतं आहेत थाळीचा आस्वाद

पोलादपूर संदिप जाबडे
      महाराष्ट्र शासनाने सन 2020 मध्ये महाराष्ट्र शिवभोजन योजना राबविण्याचे सुरु केले. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने गरीब, वंचित आणि कष्टकरी लोकांना अत्यंत कमी दरात म्हणजे दहा रुपयात पोटभर जेवण देणारी योजना सुरू केली. राज्यातील शहरी भागात अथवा ग्रामीण भागात समाजात आजही एक वर्ग असा आहे कि ज्यांना एक वेळचे जेवण मिळवणे कठीण जाते कारण त्यांच्याकडे सामान्य रोजगार नसतो, असे नागरिक ग्रामीण भागातून शहरांमध्ये रोजगार शोधण्यासाठी जातात, परंतु शहरांमध्ये स्वस्त दरात जेवण उपलब्ध होणे कठीण जाते, त्यामुळे या नागरिकांसमोर जेवणाची समस्या निर्माण होते. अशा लोकांना पोटची भूक भागवता यावी या उद्देशाने सुरु केलेली ही योजना महायुती सरकारच्या कार्यकाळात देखील लोक कल्याणकारी ठरत आहेत. 
        राज्य शासनाला एक थाळीला शहरीभागात 50/- रुपये आणि ग्रामीण भागात 35/- रुपये पडतात. आणि गरीब नागरिकांना शिव भोजन थाळी 10/- रुपयात उपलब्ध केली जाते. वितरकाला उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या देण्यात  येते. शिवभोजन थाळीमध्ये भात, डाळ, वरण, २ चपात्या असे जेवण समाविष्ट असते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रुची हॉटेल येथे देखील शिवभोजन थाळी योजना उत्तमरीत्या सुरू असुन प्रतिदिन ५० जण तर महिन्याला जवळपास १५०० गरीब, गरजू मजूर, विद्यार्थी या थाळीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांची भूक भागवणारे शिवभोजन
 पोलादपूर तालुका हा अतिदुर्गम भागातील तालुका असल्याने येथे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे बहुतांशी गरीब घरातील आहेत. त्यातच कुडपण, परसुले, पलचील, गोलदरा, कामथे, हलदुळे, देवळे, आडावळे, सवाद, धारवली, कोतवाल,ओंबळी, कशेडी बंगला यांसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी सकाळी पाच ते साडे पाच वाजता घर सोडावे लागते. दुपारच्या गाडीने परतीचा प्रवास झाला तर दुपारी दोन वाजेपर्यंत घरी पोहचतात. मात्र महाविद्यालय व शाळा सुटल्यावर भुकेने व्याकूळ झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना हॉटेल मध्ये मिळणारी १०० रुपयांची थाळी ही खिश्याला परवडणारी नाही. त्यामुळे हे विद्यार्थी रुची हॉटेल येथे शिवभोजन थाळीचा आस्वाद घेताना दिसतात. रुची हॉटेल मध्ये मिळणारी शिवभोजन थाळी ही अत्यंत चविष्ट, चवदार,दर्जेदार आहेच परंतु हॉटेल व्यावसायिक आनंद चिकणे, विनोद दाभेकर यांच्या हॉटेलवर सर्व्हिस देखील उत्तमरीत्या देत असल्याने एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी हॉटेल रुची यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments