Type Here to Get Search Results !

समाजसेवक शिवराम उतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पार्लेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

पोलादपूर संदिप जाबडे

मागील पन्नास वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या शिवराम सिताराम उतेकर यांचा ७३ वा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करीत साजरा करण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, परीक्षा पॅड तसेच शाळेसाठी वॉटर फिल्टर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप यानिमित्ताने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवराम उतेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल, बुके व श्रीफळ देऊन स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी समाजसेवक शिवराम उत्तेकर यांच्या जीवनातील कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली.

आयोजित कार्यक्रमाला उपस्थित गावच्या सरपंच आशा पवार यांनी शिवराम उतेकर यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार संदीप जाबडे यांनी शिवराम उतेकर  करीत असलेल्या निस्वार्थी समाजसेवेची गरज समाजाला असून समाजाने देखील शिवराम उतेकर यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. गेल्या पन्नास वर्षापासून शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सभामंडप, बुद्ध विहार, रुग्णांना आर्थिक मदत, शाळांचा इमारतींसाठी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना दत्तक घेणे आदी केलेल्या समाजकार्याची माहिती उपस्थितांना दिली. शिवराम उत्तेकर यांच्यासारखे समाजसेवक पुन्हा पुन्हा जन्माला येवो असे सुतोवाच यावेळी काढले. माजी सैनिक मधुकर शिंदे यांनी आम्ही सर्वच कठीण परिस्थितीमध्ये शिकलो परंतु तुम्हाला आई-वडिलांच्या कृपेने सर्व काही मिळत आहे याचा पुरेपूर फायदा घेऊन उच्चशिक्षित व्हावं असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्यानंतर समाजसेवक शिवराम उतेकर यांचा ७३ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला समाजसेवक शिवराम उतेकर, पार्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा पवार, सदस्या नीता कदम, पत्रकार संदिप जाबडे,माजी सैनिक मधुकर शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती पार्लेवाडी उपाध्यक्ष महेंद्र कदम, सदस्य संपत पवार, प्रकाश पवार, संगीता कदम, दिनकर उतेकर, प्रसन्नजीत निकम, अंकुश सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

विद्यार्थ्यांनो तुम्ही उच्चशिक्षित व्हा परंतु आपल्या आई-वडिलांना विसरू नका. आपले पहिले गुरू हे आपले आई वडील आहेत आणि दुसरे गुरु हे आपले शिक्षक आहेत. त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक द्या यातच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. मोठे झाल्यावर तुम्ही सुद्धा शिक्षणासाठी मदत करा.

समाजसेवक शिवराम उत्तेकर


Post a Comment

0 Comments