प्रतिनिधी चंद्रहास नगरकर
महाड तालुक्यात रविवार 21 जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घटनांमध्ये तरुणासह एका वृद्धाचा बळी गेला आहे.
बाळाजी नारायण उतेकर वय वर्षे 65 असे या मृत वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून ते वाळण खुर्द येथील रहिवासी होते. गावाजवळ आपली गुरे चारण्यासाठी गेले असताना परतताना रेडे वहाळ या ओढ्यातून जात असताना पाण्याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. त्यांच्या सहकाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांना त्वरित महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या एका घटनेमध्ये आमशेत गावातील अंकित म्हामुणकर हा तरुण सातसडा या रानवडी खुर्द येथील धबधब्यावर गेला असता बुडून मरण पावला असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी बंदी असताना देखील काहीजण बंदी आदेश मोडून आपला जीव धोक्यात घालून अजूनही पर्यटनस्थळी जात आहेत. अशा अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांनी व प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments