विधान परिषदेच्या 11 जागांवर कोणाची वर्णी लागणार?
मुंबई (मिलिंद माने)
राज्याचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. मात्र जुलै महिन्यात ११ जागा रिक्त होत असून राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर या अकरा जागांवर कुणाची वर्णी लागणार याबाबत मोठ्या प्रमाणावर पावसाळी अधिवेशनात घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
राज्याचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत आपली वर्णी लागण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे कायम पक्षश्रेष्ठींना गळ घालत असतात. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून उमेदवार निवडून येण्यापर्यंत मोठा घोडेबाजार होत असल्याच्या चर्चा या विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐकण्यास मिळतात. मात्र शेवटी पक्ष नेतृत्वची ज्याच्यावर मर्जी आहे तोच विधान परिषदेत निवडून गेल्याचे आजपर्यंत पाहण्यास मिळाले आहे. राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेत एकूण सदस्य संख्या ७८ असून त्यातील ३० सदस्य हे विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात तर स्थानिक प्राधिकरणातून निवडून द्यायच्या २२ जागांपैकी ११ सदस्य हे २७ जुलै २०२४ रोजी निवृत्त होत आहे. मात्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समिती यांच्या निवडणुका न झाल्याने स्थानिक प्राधिकरणातून निवडून द्यायच्या ११ जागा अद्यापी रिक्त आहेत तर पुणे, अमरावती, मुंबई, नाशिक, औरंगाबाद ,कोकण ,नागपूर या सहा महसूल विभागातून शिक्षक मतदारांसाठी निवडल्या जातात. त्यापैकी मुंबई व नाशिक या दोन शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागली आहे. नागपूर ,औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), पुणे, मुंबई ,कोकण ,अमरावती, नाशिक या पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. त्यापैकी मुंबई व कोकण या दोन पदवीधर मतदारसंघातून रिक्त झालेल्या जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे तर राज्यपाल नियुक्त १२ जागा यामागील तीन वर्षापासून रिक्त असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
विधान परिषदेतून २७ जुलै २०२४ रोजी रिक्त होणाऱ्या जागांचा तपशील पक्षनिहाय पुढील प्रमाणे;
भारतीय जनता पार्टी
निलय नाईक, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, विजय भाई गिरकर हे चार सदस्य निवृत्त होत आहे
शिवसेना पक्ष
अनिल परब व मनीषा कायंदे यापैकी अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत तर मनीषा कायंदे या मागील वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बाबा जानी दुर्रानी मात्र हे नक्की शरदचंद्र पवार गटात आहे की अजित पवार गटात याबाबत शासंकता व्यक्त होत आहे
काँग्रेस पक्ष
वजाहत अथर मिर्झा व प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष
जयंत प्रभाकर पाटील
राष्ट्रीय समाज पक्ष
महादेव जानकर
मागील वर्षभरापूर्वीच शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर उरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अर्धे आमदार तर अर्धे आमदार शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहेत. विधानसभेतून विधान परिषदेमध्ये सदस्यांकडून निवडून द्यायच्या जागेसाठी मतांचा कोटा २७ असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दोन जागा पूर्वी होत्या मात्र सद्य परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे १५ आमदार असल्याने त्यांना १२ आमदारांचा कोटा पूर्ण करणे अवघड जाणार आहे तीच परिस्थिती शरदचंद्र पवार गटाकडे आहे मात्र लोकसभा निवडणुकीत रायगडचा एकमेव खासदार अजित पवार गटाकडे आल्यानंतर अजित पवारांसोबत आता नेमके किती आमदार आहेत व ते विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला मतदान करणार याबाबत देखील राष्ट्रवादीच्या गटामध्ये उलट सुलट दावे ऐकण्यास मिळत आहे. भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट तसेच अजित पवार गट हे तिन्ही जण किती उमेदवार उभे करतात यावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मशाल हा पक्ष शरदचंद्र पवार यांचा तुतारी हा पक्ष तर काँग्रेस पक्ष या पक्षांमध्ये अद्याप कोणी किती उमेदवार उभे करायचे याबाबत कोणती चर्चा झाल्या नसल्याचे समजते मात्र दोन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणुकीची गणिते ठरणार असल्याने या निवडणुकीकडे मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांमधून खलबते चालू झाली आहेत
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी जुलै महिन्यात निवडणुका होत असून या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन पक्षाच्या आमदारांमध्ये किती मते फुटू शकतात यावरच राज्याच्या राजकारणातील भावी गणिते ठरणार आहेत. शेकापचे पाटील व रासपचे जानकर यांचे भवितव्य कठीण?
शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे जयंत प्रभाकर पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा राज्यात एकही आमदार नसल्याने त्यांना सूचक कोण राहणार हे देखील मोठे गौडबंगाला असल्याचे बोलले जात आहे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पराभूत उमेदवार अनंत गीते यांना जाहीर रित्या पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाने दिला होता मात्र अलिबाग मध्ये शेकापची जर मते असती तर तटकरेंना एवढे मताधिक्य कसे प्राप्त झाले असते अशी चर्चा असल्याने या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत प्रभाकर पाटील हे सूचक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदारांकडून मतांची जुळवाजवळ करणार की भाजपाकडून मतांची जुळवाजवळ करणार याबाबत रायगडच्या राजकारणात तर्क वितर्क लढविले जात आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांचा देखील पराभव झाल्याने व विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत देखील संपत असल्याने पुन्हा आमदार होण्यासाठी महादेव जानकर यांना भाजपाच्या मतांचीच गरज लागणार आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना पुन्हा भाजपा संधी देते की धनगर समाजातून दुसऱ्या कोणाची वर्णी लावून महादेव जानकर यांना बाहेरचा रस्ता दाखविते हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेमध्ये निवडून द्यायच्या ११ जागांसाठी येत्या जुलै महिन्यात होणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असणार असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांची विभागणी तर होईलच परंतु मतांसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment
0 Comments