रायगड : "नरेंद्र मोदीच आहेत या देशाचे वाली म्हणून मी आलो आहे तुमच्या पाली". "महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते!."उद्धवजी ठाकरे करते है बातें बडी बडी, लेकिन चुनकर आने वाली है सुनीलजी की घडी"!! अशा काव्यमय शेरो शायरीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी महायुतीच्या पाली येथील प्रचारसभेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे संकेत दिले.
पुढे रामदास आठवले म्हणाले जवळपास ४६ कोटी लोकांना या सरकार कडून मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेलं आहे.५० हजारांपासून ते १० लाखांपर्यंत विना अट विना तारण कर्ज तसेच ५० हजारांपासून २० लाखांपर्यंत कर्ज योजना आता तयार करण्यात आल्या आहेत. आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम,शीख दलित, आदिवासी,ओबीसी अशा सगळ्या समूहातील लोकांना त्याचा लाभ घेता येईल.या सर्व समूहातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून ४ कोटी लोकांना घरे देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं आहे.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ५ लाखाची दवाखान्यातील उपचारासाठी योजना राबविण्यात आली आहे. तसेच राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग,समृद्धी महामार्ग सारखे रस्त्याचे जाळे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या सरकारने विणले आहे.
महाविकास आघाडी ही समाजात भेद निर्माण करण्याचे काम करते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताला तोडण्याचं काम राहुल गांधी यांच्या माध्यमातून हे इंडिया आघाडी करत आहे.
संविधानाच्या माध्यमातून सर्व देश एकत्र करण्याचं काम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे आणि ते संविधान तोडण्याचं काम कोणी केलं तर आम्ही त्याला झोडल्या शिवाय राहणार नाही. राष्ट्रवाद हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकविला आहे. राष्ट्रवाद म्हणजे जात,धर्म,पंत, भाषा यापेक्षा देश महत्वाचा आहे.असे रामदास आठवलेंनी प्रचार सभेत संबोधित केले. त्यामुळे महायुतीचा ४०० पार चा नारा पूर्ण करण्यासाठी घड्याळा समोरील बटन दाबून बहुमताने सुनील तटकरे यांना निवडून देण्याचे आवाहन रिपाइं च्या कार्यकर्त्यांसह मतदारांना केले.
तसेच सुनील तटकरे हे एक ते दीड लाखांच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास देखील आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात मागील चार दशके रायगड कोकणात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.
तर देशातील जनता सुज्ञ असून विकास कामे करणाऱ्या महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना जनता निवडून देईल असे तटकरे म्हणाले. तर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी देखील प्रचार सभेत विरोधकांवर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्यांवर हात घातला ते म्हणाले पूर्वी एका विहिरीसाठी निधी मिळत नव्हता आता मात्र घरात नळ येण्यासाठी मागणी होत आहे. तर भाजप नेते आरिफ मनियार यानी सुधागडात अनंत गीतेंचे एक काम दाखवा व एक लाख रुपये मिळवा असे आवाहन केले आहे. हे सरकार मुस्लिम विरोधी असल्याचे विरोधकांनी लोकमनात पसरवले आहे असे नसून हे महायुतीचे सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचे यावेळी सांगितले.
या प्रचार सभेला पेन सुधागड चे आमदार रवींद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील दादा पाटील, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई, भाजप राज्य कार्यमारिणी सदस्य राजेश मपारा, रिपाइं जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड, भाजप नेत्या गिता पालरेचा, रिपाई युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, रवींद्र देशमुख, संजय म्हात्रे, रिपाइं नेते रवींद्रनाथ ओव्हाळ, रिपाइं तालुकाध्यक्ष राहुल सोनवळे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे, भाजप नेते आरिफ मणियार, अनुपम कुलकर्णी, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.तर सुधागड तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments