रोहा : रायगड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी दवे रोड , रोहा येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नेमके सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाली. तेव्हा त्यांनी अजान संपेपर्यंत आपले भाषण थांबवले. या प्रचार दौऱ्यात ही दुसरी वेळ होती. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यावेळी नेमकी अजान सुरू झाली. त्यानंतर लगेचच तटकरे यांनी आपलं भाषण थांबवलं, असे दोनदा घडल्याने सुनील तटकरे यांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.
अजान बंद झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री अंनत गिते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजान सुरू झाल्यावर अनंत गीते कधीही भाषण करताना थांबले नाहीत. 2009 साली जेव्हा बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात अनंत गीते यांनी प्रचार केला. तेव्हा बॅरिस्टर अंतुले यांचा उल्लेख 'हिरवा साप' असा केला होता. मुस्लिम समाजाचा उल्लेख 'हिरवा अजगर' असा केला होता. इतकेच नव्हे तर यांना ठेचून काढा, अशी भाषा केली होती.
काश्मीरमध्ये आज 370 कलम हटवण्यात आले. त्यामुळे तेथील जनतेचा विकास होत असून तेथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सीएए कायद्यामध्ये देखील भारताबाहेरून येणाऱ्या शीख, बौद्ध व इतर अल्प संख्यांक नागरिकांना भारतीय असण्याचा पुरावा मिळण्यासाठी राहण्याची अट कमी करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात सध्या राहत असलेल्या मुस्लिम नगरीकांवर काहीही परिणाम होणार नाही. तरी देखील विरोधकांकडून अल्पसंख्याक मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला जात आहे. तुमचा आणि आमचा भाईचारा स्पष्ट आहे. पण समाजा समाजामध्ये, जाती - धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचे काम हे काही जणांकडून हेतू पूर्वक केलं जात आहे. असा आरोप देखील सुनील तटकरे यांनी गितेंवर लावला.
यावेळी देशातील कुठल्याही राष्ट्रभक्त नागरिकावर अन्याय होणार नाही, अशी स्पष्टपणाची भूमिका संसदेत घेईन, असा शब्द तटकरेंनी येथील जाहीर सभेत दिला. तसेच तुमच्या मतावर भविष्याची वाटचाल करायची आहे. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ज्या विचारधारेवर अनेक वर्षे वाटचाल करत आलो तीच विचारधारा पुढे नेण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असा विश्वास देखील सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments