दापोली : पावसाळा आला की आळंबी उगवते तशी लोकसभा निवडणूक आली की अनंत गीते दिसतात. पण मधल्या पाच वर्षात हा माणूस कोणाच्याही मातीला, सुखाला - दुःखाला दिसत नाही. समाजाच्या नावाने मतं घ्यायची आणि परदेशात जावून मजा करायची अशी अनंत गीतेची प्रवृत्ती आहे. हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. येणाऱ्या निवडणुकीत हा काळा डाग कोकणवासीयांनी कायमचा पुसून टाकावा,असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी केले.
रायगड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी दापोली शहरात महायुतीची भव्य जाहीर प्रचार सभा आज संपन्न झाली. यावेळी रामदास कदम बोलत होते. यावेळी उमेदवार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम , शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, आरपीआयचे दादा मर्चंडे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याची वेळ येईल तेव्हा चार अक्षरांची शिवसेना हे दुकान बंद करेन असे जाहिरपणे सांगितले होते. पण आज काय अवस्था आहे, बघा! त्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील. ज्या मतदारसंघात मातोश्री आहे, ज्या मतदारसंघात उबाठा गटाचे नेतृत्व राहते त्या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे पंजावर मतदान करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
विद्यमान खासदार अनंत गीते यांच्यावर टीका करताना सुनील तटकरे म्हणाले, मशिदीत नमाज पाडणारे दलाल आहेत, असे द्वेष पसरवणार्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. जाणीवपूर्वक द्वेष पसरवू नका. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप करु नका, मागे २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या सोळाव्या राउंडला अनंत गीते बाहेर निघून गेले होते. ४ जूनला लागणार्या निवडणूकीच्या निकालावेळी अनंत गीते तिसऱ्याच राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे असे काम करा, असे आवाहन तटकरे यांनी केले.
Post a Comment
0 Comments