Type Here to Get Search Results !

ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही, ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही त्या माणसाकडून अपेक्षा करायच्या नसतात

श्रीवर्धन: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचा प्रचार आज संपणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचार जोमात सुरू आहे. कामे संपत नसतात. एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होते, पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही, ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही त्या माणसाकडून अपेक्षा करायच्या नसतात. काही वेळा काम केल्यानंतर अपेक्षा वाढतात. माझ्या कार्यप्रणालीवर असलेला तुमचा विश्वास ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहे, अशा शब्दात रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार  सुनील तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ श्रीवर्धन शहरात  तीन कॉर्नर सभा  पार पडल्या. या कॉर्नर सभांना महंमद मेमन, देवेंद्र भैसाणे, वर्षा श्रीवर्धनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नासीर काझी आदींसह श्रीवर्धन शहरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीवर्धनच्या नावातच 'श्री' पण आहे आणि 'वर्धन' पण आहे. 'वर्धन' याचा अर्थ 'वृध्दी' आणि 'श्री' म्हणून आपल्या शुभ कामाची सुरुवात करतो. ज्या गावाच्या नावातच श्रीवर्धन आहे त्या गावाची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्यात लागते, असे सुनील तटकरे म्हणाले. हाताची बोटे सारखी नसतात तरीसुद्धा दीर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी मिळते. तेव्हा त्या संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती लागते, असे तटकरे म्हणाले.

निसर्गाने या भूमीला वरदान दिले आहे. कौलारू घरे... नारळी सुपारीच्या, आंब्याच्या बागा... या गुणवैशिष्ट्यासह असलेल्या या भूमीमध्ये त्याचपध्दतीने विकासाची कामे करावीत, रोजगाराची साधने उभी करावीत यासाठी प्रयत्न केले. टप्प्याटप्प्याने रूप बदलत गेले, शहर बदलत गेले, समुद्रकिनाऱ्याची नजाकत अधिक वाढत गेली, असे गौरवोद्गार तटकरे यांनी काढले.

कामे करायची तर मनापासून. कोण काय वागलं यापेक्षा आज आणि उद्याचे स्वप्न नेमके काय या गोष्टीकडे भर देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काम निर्माण करता येते. भविष्यात काय करणार याचा आपल्याकडे रोडमॅप तयार असला पाहिजे, असेही सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, यावेळी तटकरेंनी श्रीवर्धनवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या जीवनेश्वर मंदिरात जाऊन जीवनेश्वराचे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments