माणगाव, रायगड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे गौरवाचे स्थान अढळ ठेवण्यासाठी मोदींची प्रचंड मेहनत, त्यांनी दाखवलेली परराष्ट्र धोरणे, परराष्ट्रनीती आहेत. शेजारची राष्ट्रे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत होती पण गेल्या दहा वर्षांत आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही, हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवत आहे. हे सगळे करत असताना देशातील सर्वसामान्य माणसासाठीही नरेंद्र मोदी काम करत आहेत, अशा शब्दात सुनिल तटकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. माणगाव येथील झिराड गावी महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून १९५२ पासून आतापर्यंत १८ व्या लोकसभेला आपण सामोरे जात आहोत. सतरावेळा या देशातील सर्वसामान्य माणसांनी आपल्यापरीने कुणाचे सरकार या देशात असावे?कोण योग्य पध्दतीने देशाचे नेतृत्व करु शकतो?सर्वसामान्य मतदारांना एकसंघ कोण ठेवू शकतो? न मोजता येणार्या बोलीभाषांचा आपला देश, अनेक धर्मियांचा देश, या देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता टिकवायची असेल तर ते नेतृत्व ठरवण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला. जनतेला दिलेल्या अधिकाराचा योग्य पध्दतीने वापर करत देशात झालेली अनेक स्थित्यंतरे तुम्ही-आम्ही अनुभवत आहोत आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत त्या संविधानाबद्दल आणि हेतूबद्दल आज शंका विरोधी पक्ष निर्माण करत आहेत, याबद्दल तीव्र नाराजी यावेळी त्यांनी व्यक्त केली.
चंद्रयान चंद्रावर गेले ते आपल्या शास्त्रज्ञांमुळे हे मान्यच परंतु त्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व श्रेय दिले पाहिजे होते. परंतु विरोधकांकडून संकुचित विचार पहायला मिळाले, याचाही उल्लेख केला.
या जाहीर सभेला भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, दिलीपशेठ भोईर, हर्षल पाटील, आदींसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments