रायगड : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. विरोधकांकडून आंबेडकरी व अल्पसंख्याक जनतेमध्ये जाणीवपूर्वक विखार पसरवून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे.. व्हॉटसअपच्या माध्यमातून तसे मेसेज जात आहेत, ही बाब चिंताजनक आहे. निवडणूका येतील-जातील पण निवडणुकीच्या माध्यमातून आपण समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करतोय, धर्माधर्मांमध्ये अंतर निर्माण करतोय, त्याचे काय? याचा विचार अनंत गीतेंना कधी पडणार आहे की नाही? असा संतप्त सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.
दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघातील पालगड जिल्हा परिषद गटात महायुतीची जाहीर प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी तटकरे बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री मदास कदम, आमदार योगेश कदम , शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, अण्णा कदम, दादा मर्चंडे, मुजीब रुमाणे, रमा बेलोसे आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, अनंत गीते यांचे आयुष्य मुस्लिम द्वेष करण्यात गेले. कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालताना अनंत गीतेंना कुणी बघितले का? रायगडचे खासदार दीर्घकाळ राहिले पण छत्रपतींच्या रायगड किल्ल्यावरील समाधीचे दर्शन घेण्यासाठीही हे गृहस्थ ४० वर्षांत गेलेले नाहीत. ना राज्याभिषेक सोहळा... ना जयंती... ना पुण्यतिथीला गेले. राजमाता जिजाऊंच्या चरणीसुध्दा नतमस्तक झाले नाहीत, यांना काय नैतिक अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?
ज्यांना स्वतः चा खासदार निधी वापरता येऊ शकत नाही त्यांनी कधी विकासाच्या नावावर बोलू नये अशी टीका करताना तटकरे म्हणाले, गीतेंचा अजेंडा आता एकच भाजपला बकासुर म्हणणे, शिवसेनेच्या नेत्यांना टकमक टोक दाखवणे हाच आहे. ३० वर्षे संसदेत काम करणाऱ्या या व्यक्तीची भाषा अशापध्दतीची आहे. आमच्याकडे रोडमॅप आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचाही आहे आणि पुढच्या पाच वर्षांचादेखील आहे. जेव्हा देशाच्या १८ व्या संसदेत जाईन त्यावेळी भारत सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आणण्याचे काम प्रामाणिकपणे करेल, असा शब्द तटकरे यांनी यावेळी दिला.
'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' ही संकल्पना ज्या साने गुरुजींनी दिली, त्या भूमीतील तुम्ही-आम्ही आहोत. बलसागर भारत होवो याचा अर्थ विश्वात या भारताचे नाव जावो हे सानेगुरुजींनी त्या कालावधीत म्हटले होते. नरेंद्र मोदी त्याचपध्दतीने काम करत आहेत. विश्वात हा देश बलशाली होण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातोय त्यावेळी ऐतिहासिक स्वरुपाची निवडणूक आणि माझ्यासारखा कार्यकर्ता यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन तटकरे यांनी उपस्थितांना केले.
या भागात प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचे काम सचोटीने केले जाईल. राज्यसरकारकडे जे जे प्रस्ताव असतील त्यांना पापणी लवायच्या अगोदर अर्थमंत्र्यांची सही दिली जाईल, तसेच कोयनेचे पाणी तिन्ही जिल्ह्यांत खेळवावे. पूर्णपणे या कोकणात निसर्गाच्या भूमीत कृषी, औद्योगिक रचनेचा पाया रचावा, असा संकल्प रामदासभाईंनी केला आहे, त्याला भारत सरकारची मान्यता मिळाली असून याला लागणारा निधी मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो असेही तटकरे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments