Type Here to Get Search Results !

सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे कोकणवासीय हैराण, रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांची दमछाक वाढली

 


मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून त्यामुळे लोकल रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.मध्य रेल्वेवर सीएसएमटीच्या फलाटांचा विस्तार करण्यासाठी १७ मेपासून ते १ जूनपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक आहे. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे सहकुटुंब कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणारे प्रवासी हवालदिल झाले आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे सीएसएमटीपर्यंत आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना पनवेलला उतरावे लागत आहे. मांडवी एक्स्प्रेस उशिरा धावत असल्याने प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसने शुक्रवारी जायचे नियोजन आहे. त्याप्रमाणे दादरवरून एक्स्प्रेस पकडणार होतो. मात्र, आता टॅक्सीचा खर्च करून पनवेल गाठावे लागणार आहे. आरक्षित तिकीट असूनही, हाल होणार आहेत, असे गिरगावमधील एका प्रवाशाने सांगितले.

मध्य रेल्वेने ऐनवेळी कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलवरून सुटण्याची घोषणा केली. माझा विरार ते खेड असा प्रवास आहे. विरारवरून मध्य रेल्वेवरील दादर किंवा ठाणे गाठणे सोपे होते. मात्र, पनवेलवरून एक्स्प्रेस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. -मंगेश यादव, प्रवासी

शुकवारी कोकणकन्या एक्स्प्रेसने संगमेश्वरपर्यंत प्रवास करायचा आहे. राहायला वरळीला असल्याने दादर जवळचे स्थानक होते. मात्र, आता पुन्हा दादरवरून कुर्ला गाठावे लागेल. त्यानंतर पुन्हा लोकल बदलून पनवेलला जावे लागेल. त्यानंतर कोकणकन्या पकडावी लागेल. त्यामुळे दमछाक होणार आहे. -अमित भेरे, प्रवासी

भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रेल्वे सुटण्याच्या १२० दिवसापासून सुरु होते. त्याप्रमाणे प्रवासी रेल्वेगाड्याचे तिकिटे काढतात. मात्र रेल्वेचा कारभार ऐनवेळी बदलल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडते. यात आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांचे तिकीटाचे पैसे वाया जातात. तसेच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांना घेऊन प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होतात. रेल्वेने कोकणकन्या पनवेलऐवजी दिवा, ठाणे किंवा दादरपर्यंत चालवणे आवश्यक आहे. -यशवंत जड्यार, सचिव, वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी

Post a Comment

0 Comments