Type Here to Get Search Results !

मी खासदार झालो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच: सुनिल तटकरे

रायगड : अनंत गीते हिरवा साप म्हणून अल्पसंख्याक समाजाला बोलत आले आहेत आणि आज त्यांच्याच मनामध्ये विद्वेष आणि वेगळी भावना निर्माण करत मते घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुमच्या रक्तारक्तात आणि रोमारोमात अल्पसंख्याक समाजाबद्दल काय भावना आहेत हे तुमच्या भाषणातून, तुमच्या कृतीतून व वक्तव्यातून सिध्द होत आले आहे. अनंत गीते सुधागड तालुक्यातील पाली शहरातील एखादे काम दाखवा आणि तुमचे बक्षीस घेऊन जा, असे थेट आव्हानच रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांना दिले आहे. पेण विधानसभा मतदारसंघात सुधागड तालुक्यातील पाली येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज व्हॉटसअपच्या माध्यमातून समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करत जे सामंजस्य राखण्याचे आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न केले.  त्याला जाणीवपूर्वक नख लावण्याचे पाप इंडी आघाडीच्या आणि अनंत गीते यांच्या माध्यमातून या मतदारसंघात केले जातेय, यापासून सर्वांनी सावध रहा, असे आवाहन यावेळी केले. 

तुम्ही - आम्ही आंबेडकर आणि बौध्द जयंती, ईद, गणपती उत्सव बंधुत्वाच्या नात्यातून साजरा करत असतो. आपल्या मनामध्ये जो माणूस म्हणून जन्माला आला त्या माणुसकीचा गहीवर मनामध्ये ठेवत माणुसकीच्या आधारेच वाटचाल करत आलो आहोत. मात्र जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचे काम केले जात आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाज खूप आहे.  गेली ४० वर्ष या समाजाशी जोडलो गेलो आहे, हेही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

मी आज तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे.  तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही प्रणालीमुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुम्ही-आम्ही आज आहोत. म्हणूनच संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतांच्या बेगमीवर डोळा ठेवणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला ठेवा आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे तिसर्‍यांदा सरकार आणण्यासाठी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी राज्य आणि केंद्रसरकारच्या विविध योजना आपल्या परिसरात आणण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर बटण दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहनही तटकरे यांनी  केले.

Post a Comment

0 Comments