Type Here to Get Search Results !

काही विकृत मनोवृत्ती संविधानाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत : सुनिल तटकरे

रायगड : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणात वाढत्या उन्हाबरोबरच राजकीय तापमान वाढत आहे.  जी विकृत मनोवृत्ती आपल्या आसपास संविधानाबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करा, असे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. 
रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुरुड शहरात आठवले गटाच्यावतीने आंबेडकरी अनुयायांचा जाहीर मेळावा पार पडला, या मेळाव्यात तटकरे बोलत होते.  यावेळी अलिबाग - मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बबन शिंदे, शिवसेना नेते भरत बेलोसे, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, आदींसह महायुतीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आता तुम्हाला जो संघर्ष करायचा तो विकासासाठी... तो संघर्ष... तो विकास... तुमच्या पायाशी आणून देण्याचे काम करणार असल्याचे सांगत तटकरे म्हणाले,  रायगड लोकसभा मतदारसंघात असलेली ही बुध्दविहारे म्हणजे आमच्या विचारांची... उद्याच्या भविष्याची... आमच्या आचाराची, आमच्या स्वप्नांची... एका प्रकारची ताकद आणि शक्ती देणारी आमची ऊर्जा केंद्रे आहेत. 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना स्वीकारली आणि देशात प्रजासत्ताक अर्थात प्रजेची सत्ता आली, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. प्रजा कोण तर या देशात राहणारा प्रत्येक नागरिक... ती माझी प्रजा आहे हे मानण्याचा मोठेपणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला त्यातून हा देश एकसंघ राहिला असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

पाश्चात्य देशात मूठभर लोकांना मतदानाचा अधिकार आहे. पण तुमच्या आणि माझ्या देशात श्रीमंत उद्योगपतींच्या मताची किंमत जेवढी आहे तेवढीच किंमत माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मताची आहे. लोकशाही प्रणाली व्यवस्था म्हणजे हे समान तत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यामुळे हा देश एकसंघ राहिला आहे. आज आपल्यामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र लोकशाहीचा सिध्दांत चंद्र - सुर्य असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहिल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments