रायगड : समाजाच्या नावावर आणि शिवसेना या चार अक्षरावर अनंत गीते यांना यश मिळाले. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आणि भाजप माझ्यासोबत आहे, त्यामुळे या निवडणुकीत यश हमखास मिळणार. काही गोष्टी विधीलिखित असाव्या लागतात. असं म्हणत अनंत गीते सत्तेसाठी मंत्री होतात, मी मात्र सत्तेत सेवा करण्यासाठी आलो आणि ती सेवा करण्याची संधी मिळाली. असं विधान रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केलंय. रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोलीतील आसोंड जिल्हा परिषद गटातील फणसू येथे महायुतीची प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
कुणबी समाजाला पाच कोटी रुपये अजितदादा पवार यांच्याकडून मिळवून दिले. असं म्हणत १६ व्या खासदारकीचा अडीच कोटी रुपयांचा निधी अनंत गीते खर्च करु शकले नाहीत. खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार असल्यामुळे ही निष्क्रियतेविरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. असा घणाघात देखील सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांच्यावर केला.
तर पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर मतदान करणार आहात. यावेळी खासदारकीसाठी धनुष्यबाण ऐवजी घड्याळ चिन्ह असणार असून चार महिन्याने धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून विधानसभेसाठी आमदार योगेश कदम यांना विजयी करा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, धर्म - जात यामध्ये गल्लत करत काही शक्ती पाप करत आहेत. मात्र हे पाप करणारे निवडणुका संपल्यानंतर मतदारसंघात दिसणार पण नाही. आम्ही मात्र तुमच्या सेवेसाठी एटीएमसारखे २४ तास उपलब्ध आहोत. कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी...राष्ट्रहितासाठी मला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या. असेही ते म्हणाले.
Post a Comment
0 Comments