स्पेशल रिपोर्ट संदिप जाबडे
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ३२ रायगड लोकसभेमध्ये देखील तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यां बरोबरच वंचित बहुजन आघाडी कडून सुशिक्षित असणाऱ्या मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यादेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने रायगड लोकसभेसाठी तगडा उमेदवार दिल्याने ही तिरंगी लढत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'अंदर की बात है, तीन MLA मेरे साथ है' असा गौप्य स्फोट केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण येऊ लागले आहे.
यातच मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप सकपाळ यांनी दोन दिवसांपूर्वी कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत मराठा समाजाने संधीच सोनं करावं असे आवाहन मराठा समाजाच्या मतदारांना केल्यानंतर मराठा समाज कुमुदिनी चव्हाण यांच्या पाठीशी किती संख्येने उभा राहतो हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गाव बैठका घेण्यावर भर दिला असून जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर उद्या सकाळी साडेदहा वाजता महाड येथील चांदे क्रीडांगणावर येत असून या सभेसाठी रायगड लोकसभा मतदार संघातून मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अल्पसंख्याक उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात असून सभेच्या उपस्थितीकडे विरोधकांचे लक्ष असणार आहे. तसेच या सभेत बाळासाहेब आंबेडकर कुणावर निशाणा साधणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
Post a Comment
0 Comments