रायगड : माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला. तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना उभा केला. त्यातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. मात्र अनंत गीतेंकडे दोनवेळा हेच खाते असताना त्यांनी कोकणात किंवा या मतदारसंघात एकही कारखाना उभा केला नाही किंवा रोजगार उपलब्ध करून दिला नाही. आठवेळा भाजपसोबत निवडणूका लढलेले अनंत गीते आज त्याच भाजपवर आरोप करत आहेत एवढा कृतघ्न माणूस कुठे पाहिला नाही, अशी टीका रायगड येथील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली.
रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर मधील पालवण येथे महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर कांगणे आदी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, कुणबी समाजाकडे देखील अनंत गीते यांनी दुर्लक्ष केले आहे. जेव्हा कुणबी समाजोन्नती संघाची वास्तू मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी उभी राहिली. याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दु:ख झाल्याने त्या वास्तूच्या उद्घाटनालाही अनंत गीते आले नाहीत, ही शोकांतिका आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा अभिमान आम्हाला आहेच त्याचबरोबर ते मुस्लिम बांधवांची मशिदही उभी करत आहेत. हे मात्र मुस्लिम समाजाला न सांगता निवडणुकीत प्रचाराला मुद्दे नसल्याने समाजासमाजामध्ये दुषित वातावरण निर्माण करुन नरेंद्र मोदींना नाहक बदनाम करु पहात आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही दिला.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, कोकणातील तरुण मोठया प्रमाणात मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. त्यांना त्यांच्या घराजवळ रोजगार कसा उपलब्ध करता येईल यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे. पुढील पाच वर्षांचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार आहे. तुम्ही मला घड्याळ चिन्हावर मतदान करुन साथ द्या, तुमच्यासोबत कायम राहिन, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी जनतेला दिला.
Post a Comment
0 Comments